सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाची चाहूल; रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी पर्यटकांची अलोट गर्दी!
रत्नागिरी:
२०२५ या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सरत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त डोळ्यांत साठवण्यासाठी रत्नागिरीतील प्रसिद्ध भाटे समुद्रकिनारी पर्यटकांचा महापूर लोटला आहे. केवळ कोकणातूनच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातून पर्यटक या निसर्गरम्य किनारपट्टीवर दाखल झाले असून, २०२६ च्या स्वागतासाठी एकच उत्साह पाहायला मिळत आहे.
आज २०२५ चा शेवटचा दिवस. मावळत्या सूर्याच्या साक्षीने वर्षाला ‘गुडबाय’ करण्यासाठी भाटे किनारा पर्यटकांनी फुलून गेला आहे. सोनेरी वाळू आणि अथांग अरबी समुद्र यांच्या संगमावर निसर्गाचा हा सोहळा पाहण्यासाठी दुपारपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली होती.
यंदा पर्यटनासाठी कोकणाला विशेष पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. विशेषतः: पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
कडाक्याच्या थंडीतून सुटका करून घेत समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी नागपूर, संभाजीनगर आणि लातूर भागातील पर्यटकांनी रत्नागिरीची वाट धरली आहे.
पर्यटकांच्या उत्साहाला उधाण
“सरत्या वर्षाच्या आठवणी जपत आणि नव्या वर्षाच्या आशा घेऊन आम्ही या ठिकाणी आलो आहोत. भाटे किनाऱ्यावरील सूर्यास्त पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे,” अशा भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत. मुलांचे वाळूतील खेळ, कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत पर्यटक या संध्याकाळचा आनंद लुटत आहेत.
गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन सज्ज आहे. २०२६ च्या स्वागतासाठी रत्नागिरी सज्ज झाली असून, सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे.
