संगमेश्वर मध्यवर्ती बाजारपेठेत वाहतूक कोंडी
संगमेश्वर
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, मुंबईहून गोव्याकडे जाणारे अनेक वाहनचालक गुगल मॅपचा आधार घेत पर्यायी मार्ग म्हणून संगमेश्वर बाजारपेठेचा मार्ग वापरत आहेत. परिणामी संगमेश्वर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेत वाहनांची गर्दी वाढून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
महामार्गावरील कामांमुळे प्रवासाचा कालावधी वाढल्याने गुगल मॅप वाहनचालकांना संगमेश्वर बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांमधून मार्ग दाखवत आहे. मात्र हा मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी असल्याने जड व खासगी वाहनांची संख्या वाढताच कोंडी तीव्र होत आहे. याचा फटका स्थानिक नागरिक, व्यापारी व ग्राहक वर्गाला बसत असून, दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत.
वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसेस तसेच अत्यावश्यक सेवांनाही अडथळे येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. चुकीच्या पर्यायी मार्गामुळे वाहनचालकही त्रस्त झाले असून, वेळ व इंधनाचा अपव्यय होत आहे.
या पार्श्वभूमीवर महामार्गावरील काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने तातडीने सुरक्षित व स्पष्ट पर्यायी मार्ग तयार करावा, तसेच दिशादर्शक फलक लावून गुगल मॅपसह इतर नेव्हिगेशन अॅप्समध्ये योग्य मार्गदर्शन द्यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. वाहतूक पोलिसांनीही तात्पुरत्या उपाययोजना करून बाजारपेठेतील कोंडी कमी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
……………………………….
……………………………….
▪️
……………………………….