पराभव जिव्हारी, काँग्रेस नेत्याचा बॅनर चर्चेत
चिपळूण : नगर पालिका निवडणुकीचा धुराळा अजूनही पूर्णपणे शांत झालेला नसतानाच येथील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या फर्मबाहेर असा काही बॅनर लावला, की पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीत स्वतः सह पत्नीलाही जनतेने नाकारल्यानंतर हा पराभव जिव्हारी लागलेल्या या नेत्याने “कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये” असा थेट फर्मानच काढलेला असा भला मोठा बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हा बॅनर कोणत्याही कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नसून, निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशीच लावण्यात आल्याने या बॅनरची खुमासदार चर्चा शहरात रंगली आहे.
विशेष म्हणजे, 40-42 वर्षे तन -मन -धनाने जनतेची सेवा करूनही आपल्यासारख्या जनसेवकाला या निवडणुकीत मतदारांनी चक्क ‘घरचा रस्ता’ दाखविल्याने काँग्रेस पक्षातील हा नेता कमालीचा अस्वस्थ झाला आहे. त्यांच्या मनातील ही सल या बॅनरमधून स्पष्ट दिसून येत आहे. “निवडणुकीत साथ दिली नाही, आणि आता देणगी मागायला येता?” असा रोख या बॅनरमागे दडलेला असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, या बॅनरकडे जाणारे-येणारे नागरिक थांबून वाचत असल्याचे दृश्य दिसत असून, सोशल मीडियावरही त्याची चर्चा रंगू लागली आहे. चिपळुणात निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या राजकीय विश्लेषणात या बॅनरमुळे नवाच ‘पॅटर्न ’ पहायला मिळाला.