धामणी पशुवैद्यकीय दवाखान्यातून साहित्याची चोरी
खेड : तालुक्यातील धामणी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२मधून चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीचे नायट्रोजन वायू साठवण्याचे भांडे लंपास केले. शासकीय साहित्य चोरीप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुदाम काशिनाथ कदम (चिंचघर-रेवेचीवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ही घटना २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. चोरट्याने दवाखान्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून गोलाकार उभट पांढऱ्या रंगाचे नायट्रोजन वायू साठवण्याचे भांडे लांबवले. दवाखान्यातून शासकीय साहित्य चोरल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर कर्मचाऱ्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.