एस.टी.- दुचाकी धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्वारावर गुन्हा
खेड:
मंडणगड-खेड मार्गावरील भिलारे आयनी येथील बारकोंबडा नदीच्या पुलावर गुरुवारी दुपारी एस.टी. बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विलास गंगाराम कोपरे (वय ६३, रा. घेरापालगड, खेड) असे मृताचे नाव असून, ते स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मंडणगड डेपोची एस.टी. बस (क्रमांक MH-14/BT-2964) खेडच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून येणारी होंडा शाईन दुचाकी (क्रमांक MH-08/X-0895) घेऊन विलास कोपरे हे भरधाव वेगाने येत होते. बारकोंबडा नदीच्या पुलावर दुचाकीस्वाराने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून एस.टी. बसला समोरून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात विलास कोपरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एस.टी. बसचे चालक जिग्नेश अर्जुन धनावडे (वय ४२, रा. महाड) यांनी याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताने वाहन भरधाव वेगात चालवून स्वतःच्या मरणास आणि अपघातास कारणीभूत ठरल्यामुळे, खेड पोलिसांनी मयत विलास कोपरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.