शृंगारपूरच्या म्हस्केवाडीत भरदिवसा बिबट्याचा थरार
घरात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची सात तासांची मोहीम यशस्वी
संगमेश्वर : तालुक्यातील शृंगारपूर म्हस्केवाडी येथे शुक्रवारी दुपारी बिबट्याने थेट मानवी वस्तीत शिरून घरात घुसखोरी केल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ग्रामस्थांचे सतर्कता आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे रात्री पावणे नऊच्या सुमारास या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले आहे.
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सदाभाऊ म्हस्के यांच्या घराच्या पडवीत (पारड्यात) बिबट्याचा वावर आढळून आला. एका कोंबडीवर झडप घालून तिला ओढून नेत असताना जयश्री म्हस्के यांनी हे पाहिले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या काही वेळ तिथेच दबा धरून बसला. ग्रामस्थ जमा झाल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला, मात्र काही वेळातच तो शेजारील महादेव सुर्वे यांच्या घरात शिरला. ही घटना वामन म्हस्के आणि विमलाकांत पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने इतरांना सावध केले.
सरपंच विनोद पवार यांनी या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक पिंजऱ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या घरातच असल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम आखण्यात आली. यावेळी राजा म्हस्के यांच्यासह गावातील अनेक तरुणांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मोलाची मदत केली.
दुपारी दोन वाजल्यापासून सुरू झालेला हा थरार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अखेर रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शृंगारपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता, मात्र तो थेट घरात घुसल्याने भीतीचे वातावरण होते. आता हा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील धोका तूर्तास टळला आहे. वनविभागाच्या या यशस्वी कारवाईबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.