खेर्डीतील तरुणाचा कामथे रुग्णालयात मृत्यू
आकस्मिक मृत्यूची नोंद
चिपळूण: तालुक्यातील तिनवड बस थांब्याच्या पिकअप शेडमध्ये बेशुद्धावस्थेत आढळलेल्या एका ३१ वर्षीय तरुणाचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विश्वास विश्राम कदम (वय ३१, रा. खेर्डी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत मयताचे वडील विश्राम पांडुरंग कदम यांनी खबर दिली आहे.
१७ डिसेंबर रोजी राजेंद्र दगडू कदम (रा. कान्हे, खांबेवाडी) यांनी विश्राम कदम यांना फोन करून त्यांचा मुलगा विश्वास हा मौजे तिनवड बस स्टॉप येथील पिकअप शेडमध्ये दारूच्या नशेत पडलेला असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर वडील विश्राम कदम यांनी तात्काळ रिक्षाने घटनास्थळ गाठले. तिथे त्यांना मुलगा विश्वास पडलेला दिसला. त्यांनी त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला असता त्याने डोळे उघडले, मात्र त्याला बोलता येत नव्हते.
वडिलांनी सोबत आणलेले ज्यूस त्याला पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजेंद्र कदम यांच्या मदतीने त्यांनी विश्वासला रिक्षातून तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विश्वास याला तपासून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ७३/२०२५ नुसार नोंद करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.