तुरळ येथे कार संरक्षक कठड्याला धडकून चालक ठार; मयत चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर: तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ मराठवाडी येथे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मयत कार चालकाने हयगयीने वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस आणि मित्राच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावरच संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सलीम सुलतान खान (वय ४४, रा. वसई, पालघर) आणि फिर्यादी सुखविंदरसिंग अर्जतसिंग संधू (वय ४७, रा. मीरा रोड, ठाणे) हे दोघे मित्र असून ते एमएच ०४ जेव्ही ७१९८ या मारुती सुझुकी ब्रेझा कारने मीरा रोड येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होते. कार मयत सलीम खान हे चालवत होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची कार संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हद्दीत आली असता, चालकाने अतिवेगात आणि अविचाराने वाहन चालवल्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्यावर जोरात आदळली.
या भीषण अपघातात सलीम खान यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर बाजूला बसलेले सुखविंदरसिंग संधू हे किरकोळ जखमी झाले. तसेच वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सुखविंदरसिंग संधू यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत चालक सलीम खान याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५ (अ) (ब) तसेच मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मित्रांसोबत पर्यटनासाठी निघालेल्या सलीम खान यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.