खेडमधील लोटे माळ येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर गुन्हा दाखल
खेड: चिपळूण-खेड महामार्गालगतच्या लोटे माळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे.
आरोपीकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी लोटे माळ येथील पुष्पलता कॉम्प्लेक्सच्या उजव्या बाजूकडील मोकळ्या जागेत करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रविण कृष्णा खांबे (वय ४३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रूपेश गणपत मोरे (वय ३४) हा तरुण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना नसताना, बेकायदेशीरपणे ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार खेळ खेळत होता. पोलिसांनी अचानक छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालामध्ये २६०० रुपये रोख रक्कम आणि ५ रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य मिळून, एकूण २६०५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी रूपेश गणपत मोरे याच्याविरुद्ध गु.र.नं. ३७२/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लोटे माळ परिसरात जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीवर केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.