कुंभार्ली घाटातील वाट बिबट्याने अडवली
वाहनचालकांमध्ये भीती; वनविभागाने त्याचा बंदोबस्त करा
चिपळूण : येथील कुंभार्ली घाटात शनिवारी (ता. १३) रात्री बिबट्या रस्त्यावर दिसल्यामुळे वाहनचालकांमध्ये भितीचे वातावरण होते. बिबट्या काही काळ रस्त्याच्या मधोमध थांबल्यामुळे घाटातील वाट अडवली गेली होती. त्यामुळे कुंभार्ली घाटातून प्रवास करणे धोकादायक झाल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांमधून उमटत आहे.
तालुक्यात बिबट्याने निर्माण केलेली दहशत कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आता बिबट्याचे वर्दळीच्या रस्त्यांवरही दर्शन होऊ लागले आहे. शनिवारी रात्री कुंभार्ली घाटातून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनचालकांना अचानक बिबट्या रस्त्यावर दिसला. खेर्डी एमआयडीसी कार्यालयातील सहाय्यक अभियंता संदीप पवार शनिवारी चिपळूणला येताना कुंभार्ली घाटात त्यांना प्रथम बिबट्या दिसला. प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीने गाडीच्या काचा बंद केल्या. बिबट्या काही काळ रस्त्यावर उभा होता. त्याला पाहून दोन्ही बाजूने येणारी वाहने रस्त्यावरच थांबली. वाहनचालकांनी बिबट्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या. काहीवेळाने तो निघून गेला. त्यानंतर वाहनचालकांनी सुटकेचा श्वास सोडला.
चिपळूण तालुक्यात यापूर्वी कात्रोळी, तनाळी, कळंबट येथे बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या भागात माणसाला आणि पाळीव प्राण्यांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. गुरे चरवणारे आणि शेतात काम करणारे शेतकरी, घाटमाथ्यावरून प्रवास करणारे प्रवासी यांच्यामध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागानेही नागरिकांना खबरदारी घ्या, असे आवाहन केले आहे. वनविभागाने त्या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी करत आहेत.
कोट
चिपळूण, गुहागर तालुक्यात बिबट्यांचा वावर जाणवत आहे. नागरिकांना बिबट्या दिसल्यास त्याला चिडवू नये. तो भितीपोटी नागरिकांवर हल्ला करतो. नागरिकांनी कोणतीही हालचाल केली नाही तर तो जंगलाच्या दिशेने निघून जाईल. नागरी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यास वनविभागाला संपर्क करावे.
- सर्वर खान, परिक्षेत्र वनाधिकारी