कुत्र्यांना जेवण घातले म्हणून दांपत्याला काठीने मारहाण
रत्नागिरी: अन्न हे पूर्णब्रह्म आहे.. घरातील अन्न पाळीव अथवा घरासमोर येणाऱ्या कुत्रा, मांजर, गाय यांना ते घालण्याचा प्रघात आहे. पण घरा बाहेरील भटक्या कुत्र्यांना जेवण घातले म्हणून चक्क महिलेच्या दिराने तिच्यासह तिच्या पतीला शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शहरातील पेठकिल्ला येथे घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मात्र संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन पंढरीनाथ विलणकर (वय ५२, रा. पेठकिल्ला श्रीराम मंदिर शेजारी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास पेठकिल्ला येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पर्णिका प्रवीण विलणकर (वय ५१, रा. पेठकिल्ला, श्रीराम मंदिर शेजारी, रत्नागिरी) या आणि संशयित नितीन पिलणकर हे नात्याने दिर आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पर्णिका विलणकर या घराबाहेरील कुत्र्यांना जेवण घालत होत्या. हे संशयित नितीन याने पाहिले व तेथे येऊन शिवीगाळ केली. त्यावेळी पर्णिका यांनी शिवीगाळ का करता अशी विचारणा केली असता संशयिताने तुम्ही कुत्र्यांना खाऊ घालता त्यामुळे कुत्रे येवून येथे त्रास देतात असे बोलून संशयित नितीन याने हातातील काठीने पर्णिका यांच्या हातावर, कपाळावर तसेच साक्षीदार पर्णिकाचे पती प्रवीण पंढरीनाथ विलणकर यांच्या कपाळावर हातावर व पायावर मारुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी पर्णिका विलणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.