पालवणे परिसरात बिबट्याचा वावर
दोन दिवसांत चार वासरांचा फडशा, शेतकरी दहशतीखाली
मंडणगड
मंडणगड तालुक्यातील पालवणे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, मागील दोन दिवसांत चार वासरांचा फडशा पडल्यामुळे शेतकरी भयभीत आहेत. या घटनेमुळे पालवणे विभागातील जनता आणि शेतकरी सतत भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
पालवणे धनगरवाडी येथील गरीब शेतकरी श्री महेश हिरवे व नामदेव हिरवे यांची चार वासरे बिबट्याने मारल्याचे समोर आले आहे. या भागातील शेतकरी मुख्यत्वे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यामुळे बिबट्यांचा वाढता वावर त्यांच्या उपजीविकेसाठी धोकादायक ठरत आहे.
स्थानिकांनी वनविभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे की, पालवणे परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी उपाययोजना करून त्यांना दाट जंगलात सोडले जावे, ज्यामुळे परिसर बिबटे-मुक्त होईल आणि गरीब शेतकऱ्यांचे जीवन सुरक्षित राहील.
याशिवाय, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचनेही उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी म्हटले की, वनविभागाने बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त केला नाही, तर आंदोलनाचे मार्ग अवलंबले जातील.