चिपळूण पालिकेच्या तिजोरीत निवडणुकीमुळे ‘भरघोस’ भर!
चिपळूण: चिपळूण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे पालिकेच्या तिजोरीत चांगलीच ‘भर’ पडली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करताना विविध शुल्क आणि थकीत कर भरल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात सुमारे सहा लाख रुपयांची भर पडली आहे.
निवडणूक आयोगाने घातलेल्या नियमांनुसार, कोणताही थकीत कर नसावा ही उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अट आहे. यामुळे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या अनेक इच्छुकांनी आपला थकीत कर तातडीने भरला.
नगराध्यक्षपदासाठी १३, तर नगरसेवकांच्या २८ जागांसाठी तब्बल १४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या उमेदवारांनी थकीत कर भरल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एकट्या कर वसुलीतून ५ लाख ५० हजार रुपये जमा झाले आहेत.
थकीत कर भरण्यासोबतच उमेदवारांना इतरही अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. यासाठी शेकडो इच्छुकांनी पालिकेतून विविध प्रकारचे दाखले घेतले. यामध्ये प्रामुख्याने कर थकीत नसल्याचा दाखला, नियमानुसार शौचालय असल्याचा दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला यांचा समावेश होता.
या दाखल्यांसाठी पालिकेच्या नियमानुसार शुल्क आकारण्यात आले, ज्यामुळे पालिकेच्या तिजोरीत आणखी हजारो रुपयांची भर पडली.
दाखल्यांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी पालिकेत मोठी गर्दी झाली होती. मागणीनुसार दाखले वेळेत देण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
यावर्षी कोणतेही वसुली पथक न पाठवता केवळ निवडणूक फॉर्म्युला यशस्वी ठरल्यामुळे पालिकेच्या वसुलीच्या टक्क्यात मोठी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.