चिंचघर येथे घरफोडी; ७६ हजारांचा ऐवज लंपास
खेड: खेड तालुक्यात घरफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. चिंचघर येथील रेवेचीवाडी परिसरात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ७६ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सखाराम सुर्वे (वय ५०, व्यवसाय ड्रायव्हर, रा. चिंचघर, रेवेचीवाडी, ता. खेड) हे या घटनेतील फिर्यादी आहेत. फिर्यादी सुर्वे यांच्या घरात २ डिसेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२५ या सहा दिवसांच्या मुदतीत घरफोडी झाली आहे. ते बाहेरगावी असताना सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत ही चोरी झाली असावी असा अंदाज आहे.
या अज्ञात चोरट्याने फिर्यादी सुर्वे यांच्या राहत्या घरातील बेडरूमच्या पूर्व दिशेला असलेल्या खिडकीची काच सरकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटात साड्यांच्या कप्यात ठेवलेली लॉकरची चावी शोधून काढली. या चावीच्या साहाय्याने लॉकर उघडून त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम ६,०००/- रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन चोरटा पसार झाला.
चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे ७६,०००/- रुपये इतकी आहे. यात ६,०००/- रुपये रोख रक्कम आणि अंदाजे ७०,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे. याप्रकरणी फिर्यादी गणेश सुर्वे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ४५४ आणि ३८० नुसार गुन्हा (गु.आर.नं. ३७०/२०२५) दाखल केला आहे. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.