दापोलीत थंडीचा पारा ६ अंशांवर घसरला; पर्यटकांकडून ‘मिनी मनाली’ची उपमा!
दापोली (प्रतिनिधी):
अवघ्या आठवडाभरापूर्वी १३ अंश सेल्सिअस तापमानासह दाखल झालेल्या गुलाबी थंडीने दापोलीला आता पूर्णपणे गारठून टाकले आहे. गुरुवारी येथील किमान तापमान चक्क ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. यामुळे दापोलीची तुलना आता पर्यटकांकडून ‘मिनी मनाली’शी केली जात आहे.
मागील तीन दिवसांपासून दापोलीतील थंडीचा पारा सातत्याने घसरत असल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरात जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
उबदार कपड्यांची मागणी: शहरातील कपड्यांच्या दुकानांमध्ये उबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये जाण्यासाठी थंडीच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्यास उशीर होत आहे. तासिका बुडू नयेत म्हणून विद्यार्थी हुडहुडीतही शाळेत हजेरी लावत आहेत. बोचऱ्या थंडीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामाची गती चांगलीच मंदावली आहे, ज्यामुळे दैनंदिन कामकाजावर एकूणच परिणाम झाला आहे.
एकंदरीत जनजीवन थंडीमुळे प्रभावित झाले असले तरी समुद्रकिनाऱ्यांवर भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांचा आनंद मात्र द्विगुणित झाला आहे. या कडाक्याच्या आणि गुलाबी थंडीमुळे त्यांची पर्यटन सफर अधिक सफल झाली असून, अनेक पर्यटक या वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहेत.