दापोलीत तरुणाची गळफासाने आत्महत्या
दापोली : तालुक्यातील सारंग बौद्धवाडी येथे रुपेश दामू मोहिते (वय ४०) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना रविवारी (७ डिसेंबर) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश मोहिते हे सारंग बौद्धवाडी येथे वास्तव्यास होते. दोन ते तीन दिवस त्यांच्या घरात कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने तसेच घरातील दिवेही बंद असल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांना शंका निर्माण झाली. याबाबत राहुल बाळाराम मोहिते यांना भावकीतील वसंत गंगाराम मोहिते यांचा फोन आला. त्यानंतर राहुल मोहिते, वसंत मोहिते व सुनील गमरे हे तिघे रुपेश मोहिते यांच्या घरी गेले.
घराचा दरवाजा आतून बंद असल्याने तो उघडून पाहिला असता घरातील खोलीत रुपेश मोहिते यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनेचा कालावधी ५ ते ७ डिसेंबर दरम्यानचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.