गुहागर समुद्रकिनारी स्कॉर्पिओ अडकली
गुहागर : समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी रविवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात अडकले. वाढत्या भरतीच्या पाण्यामुळे वाहन काही वेळातच समुद्रात फसले. मात्र जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढण्यात पोलिस व ग्रामस्थांना यश आले. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुहागरचा समुद्रकिनारा सुमारे सहा किलोमीटर लांबीचा असून येथे येणाऱ्या पर्यटकांना वारंवार सूचना देऊनही काहीजण नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. रविवारी कोल्हापूर येथून गुहागरला पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांनी गुहागर–वरचापाट–पिंपळादेवी मार्गाने स्कॉर्पिओ नेत सिमेंटच्या रॅम्पवरून थेट समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत वाहन घातले. त्याच वेळी भरतीचा जोर वाढल्याने काही क्षणांतच वाहन पाण्यात अडकले.
सुरुवातीला भरती ओसरल्यानंतर वाहन काढता येईल या अपेक्षेने तरुणांनी रात्री नऊ वाजेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची पातळी अधिक वाढू लागल्याने अखेर त्यांनी आपत्कालीन मदत क्रमांक ११२ वर संपर्क साधला. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्कॉर्पिओ पाण्याबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली.
दरम्यान, मनाई असतानाही समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेत जीव व मालमत्तेला धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधित युवकांवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.