कुरधुंडा नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नवनिर्मिती, समता फाउंडेशनसह ग्रामपंचायत कुरधुंडा, शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त उपक्रम
संगमेश्वर:
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर ग्रामस्थांच्या मोठ्या प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले. नवनिर्मिती फाउंडेशन, समता फाउंडेशन, ग्रामपंचायत कुरधुंडा आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाली.
या शिबिरात विविध नेत्ररोग, दृष्टीदोष आणि विशेषतः मोतीबिंदूची तपासणी करण्यात आली. अनेक नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला. शिबिराचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते सरपंच सौ. नाझिमा बांगी यांनी केलेली महत्त्वपूर्ण घोषणा. त्यांनी जाहीर केले की, शिबिरामध्ये ज्या नागरिकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले आहे, त्यांच्या शस्त्रक्रिया (ऑपरेशन) संस्थेच्या वतीने पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. या घोषणेमुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी नवनिर्मिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज, कार्याध्यक्ष जमुरत अलजी, सरपंच नाझिमा बांगी, उपसरपंच तैमूर अलजी, तंटामुक्ती अध्यक्ष इरफान नवरेकर, नेत्रचिकित्सक संकेत पाटील, समता फाउंडेशनचे नितेश शेटे, ग्रामपंचायत सदस्य संगीता लिंगायत, ग्रामसेवक श्रेया भायजे, संदेश निघावले, सुधीर खापरे, दिप्ती डावल, उमर अलजी, आणि आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे असून, याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अशा सुविधापूर्ण शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक नागरिकांनी सर्व आयोजक संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.