राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी एसआरके क्लबच्या ४ खेळाडूंची निवड
४ डिसेंबर रोजी संघ लातूरकडे रवाना; शिल्पाताई सुर्वे यांच्याकडून शुभेच्छा
रत्नागिरी: तायक्वांदो या मार्शल आर्ट क्रीडा प्रकारात रत्नागिरीच्या खेळाडूंनी राज्य स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन लातूर यांच्या सहकार्याने लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ३५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबमधील चार खेळाडूंची निवड झाली आहे.
ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे होणार आहे. वेदांत चव्हाण, अमेय सावंत, पार्थ गावडे, श्रुती चव्हाण या एसआरके तायक्वांदो क्लबचे खेळाडूंची स्पर्धेकरिता निवड झाली आहे. हे सर्व खेळाडू आज, ४ डिसेंबर रोजी, लातूर येथील स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत.
या निवड झालेल्या खेळाडूंना मिलिंद भागवत आणि शाहरुख शेख यांच्याकडे तायक्वांदोचे नियमित प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळत आहे. या खेळाडूंच्या यशाबद्दल शिवसेनेच्या नगराध्यक्षा उमेदवार शिल्पाताई सुर्वे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंच्या या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे यांच्यासह संघटनेतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी आणि क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे, एसआरके क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, आणि समस्त पालक वर्ग यांनीही या खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे.