पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा; ५६ वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल
रत्नागिरी, (प्रतिनिधी): पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावस पानगलेवाडी येथे गौतमी नदीच्या किनारी सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर बुधवारी (दिनांक ०३/१२/२०२५) दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास पूर्णगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ५६ वर्षीय आरोपीवर कल्याण मटक्याचे साहित्य आणि रोख रकमेसह महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावस पानगलेवाडी येथील गौतमी नदी किनारी बाभळीच्या झाडाखाली आरोपी गणपत रामचंद्र पानगले (वय ५६, रा. गोळप धोपटवाडी, ता. जि. रत्नागिरी) हा गैरकायदा व बिगरपरवाना कल्याण मटका जुगार खेळ खेळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत गोविंद लोहळकर (पोना/७१८) यांनी तातडीने कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान, आरोपी गणपत पानगले हा आपल्या ताबे-कब्जात नमूद वर्णनाचे आणि किमतीचे कल्याण मटका जुगाराचे साहित्य तसेच रोख रक्कम बाळगून जुगार खेळ खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह एकूण ८६०/- रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
याप्रकरणी फिर्यादी प्रशांत गोविंद लोहळकर यांच्या तक्रारीवरून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गणपत रामचंद्र पानगले याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा रजि. नं. ७९/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.