प्रभाग १० मधील निवडणुकीच्या निकालास सचिन शिंदे यांचा आक्षेप
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: उच्च न्यायालयात मागणार दाद
रत्नागिरी: रत्नागिरी नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १० ‘ब’ मधील निवडणूकीच्या प्रक्रियेवर आणि उमेदवारीवर गंभीर आक्षेप घेत, सचिन सदानंद शिंदे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यासंदर्भात शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित ‘अवैध’ कार्यवाहीविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती, परंतु तिथे अर्ज फेटाळला गेल्याने शिंदे यांनी उच्च न्यायालयात अपील करण्याची तयारी दर्शवली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, प्रभाग १० ची निवडणूक २० डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, तिचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. मात्र, श्री. शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक महत्त्वाची विनंती केली आहे.
“इतर प्रभागांच्या आणि नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकांचा निकालसुद्धा ३ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. इतर प्रभागांच्या आणि नगर परिषदेच्या पदांच्या निकालाचा फरक प्रभाग १० च्या निकालावर पडू शकतो. यामुळे माझी आपणास नम्र विनंती आहे की, ३ डिसेंबर २०२५ रोजी लागणारा निकाल हा २१ डिसेंबर २०२५ नंतर जाहीर करण्यात यावा.”
श्री. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग १० ‘ब’ मधील अपक्ष उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध काम केले आहे. या अवैध कार्यवाहीच्या विरोधात त्यांनी सर्वप्रथम जिल्हा न्यायालयात धाव घेतली, परंतु त्यांना तिथे अपेक्षित दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आता उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.