आज प्रचाराची धामधूम संपणार; रात्री १० पर्यंतच परवानगी
रत्नागिरी : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची वेळ वाढवण्यात आली असून आज १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रापंनि–2025/प्र.क्र.17/का-6, दि. 27 नोव्हेंबर 2025 चा दाखला देत हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह मिळण्यात उशीर झाल्याने त्यांना अंतिम क्षणी प्रभावी प्रचारासाठी अतिरिक्त वेळ मिळावा यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढतींना आता अधिक रंग चढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, आज रात्री १० नंतर सर्व प्रकारचा प्रचारप्रसार पूर्णपणे बंद राहील. सभा, रॅली, ध्वनिक्षेपकाचा वापर, जाहिराती, घर-घर संपर्क, सोशल मीडियावरील पेड प्रमोशन आदी सर्व उपक्रमांवर बंदी असेल. २ डिसेंबर रोजी मतदान असल्याने त्यानंतर लगेच मौन कालावधी लागू होणार असून नियमभंग करणाऱ्यांवर तातडीची कारवाई केली जाईल, अशीही सूचना प्रशासनाने दिली आहे.
प्रचाराची मुदत वाढल्यानंतर निवडणूक शेवटच्या टप्प्यात अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक उमेदवारांनी अंतिम क्षणांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.