हिंदू-मुस्लिम फाळणी झाली हे सर्वात वेदनादायी: अबू आझमी
चिपळूण: “देशाच्या फाळणीचा कागद गांधीजींनी फाडून रद्दीच्या टोपलीत टाकला असता तर त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता. हिंदू-मुस्लिम फाळणी झाली हे सर्वात वेदनादायी” असे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी चिपळूण येथे सांगितले.
येथील पालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सपाच्या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी चिपळूणमध्ये सभा घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “सावंतवाडी येथे मुस्लिम समाजाच्या तरुणाला छळ करून मारले. त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आले आणि चार फुटाच्या अर्धवट डोक्याचा मंत्री मशिदीत घुसून मारण्याचा इशारा देतो. त्यावर सरकार काही बोलत नाही. मुंबईतील सिरियल ब्लास्ट मधील आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडल्यावर हुशार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कोर्टात धाव घेतली, पण मालेगाव स्फोटात साध्वी प्रज्ञा सिंग यांचा हस्तक्षेप असताना देखील पुरावे असून कोर्टाने निर्दोष सोडल्यावर मुख्यमंत्री शांत बसले. देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात जाणीवपूर्क द्वेष निर्माण केला जात आहे. असा आरोप अबू आझमी यांनी केला.
ते म्हणाले, साध्वी प्रज्ञा सिंग यांना वाचवण्यासाठी कोर्टामध्ये वकिलावर दबाव होता हे जाहीरपणे सिद्ध झाले. स्फोटातील साक्षीदारांवर दबाव आणण्यात आला.
सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. सरकारने चिल्लूभर पाण्यात डुबून मरायला हवे. शेतकरी मेला तर तुमच्या नशिबात एक दाणा नसेल. शेतकऱ्यांची थकबाकी राहिली तर तत्काळ कारवाई केली जाते आणि उद्योजकांना कोटींची कर्जमाफी दिली जाते. “मुस्लिम तरुणी सोबत एखाद्या हिंदू तरुणाने लग्न केले तर त्याला दहा लाख देता आणि एखाद्या हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणाशी लग्न केलं तर तिच्यावर दबाव आणून गुन्हे दाखल करता. असा आरोप अबू आझमी यांनी केला.