खेडमध्ये मध्यरात्री खोलीचे ग्रील उचकटून चोरट्यांचा १० हजारांच्या रोकडवर हात साफ
खेड: खेड तालुक्यातील भरणे समर्थनगर परिसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. दिवेकर चाळीतील एका भाडोत्री खोलीचे लोखंडी सेफ्टी ग्रील उचकटून आत प्रवेश करत अज्ञात चोरट्याने सुमारे १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ३.०० ते ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी साक्षी सचिन जाधव (वय २२, रा. भरणे समर्थनगर, दिवेकर चाळ, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला नोकरीनिमित्त येथे भाड्याने राहत असून, घटनेच्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीला लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी राहत असलेल्या भाडोत्री खोलीच्या दर्शनी रुमची स्लायडिंग खिडकी गाठली. या खिडकीच्या बाहेर असलेल्या लोखंडी सेफ्टी ग्रीलच्या उजव्या बाजूकडील खिळे अज्ञात हत्याराने उचकटून काढून त्यातून आत प्रवेश केला.
खोलीत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटाजवळ जाऊन ते उघडले. कपाटातील चॉकलेटी रंगाच्या पर्समध्ये ठेवलेली एकूण १०,००० रुपये रोख रक्कम चोरून पळ काढला. चोरी केल्यानंतर चोरट्याने खोलीचा दर्शनी दरवाजाची आतून लावलेली कडी उघडून पोबारा केला. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायद्यानुसार गु.आर.क्र. २६२/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.