चिपळूणजवळ अरुंद पुलाचा अंदाज चुकल्याने टँकर उलटला; स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे वाशिष्टी डेअरीजवळ असलेल्या कॅनॉलच्या अरुंद पुलावर टँकर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पुलाच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवणे चालकाच्या जिवावर बेतले असून, या अपघातात स्वतःचा जीव गमावणाऱ्या चालकावरच निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बबन महादेव ढगे (वय ६२, रा. आटपाडी, जि. सांगली) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन ढगे हे आपला टँकर (क्रमांक एम.एच. १६ – ए.ई. ६१००) घेऊन चिपळूणच्या दिशेने येत होते. पिंपळी खुर्द हद्दीतील वाशिष्टी डेअरीजवळ असलेल्या कॅनॉल पुलावर ते आले असता, हा पूल अरुंद असल्याचे माहीत असूनही त्यांनी गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवले नाही. भरधाव वेगात असलेला हा टँकर चालकाचा ताबा सुटल्याने पुलाच्या उजव्या बाजूला जोरात पलटी झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, टँकर पलटी होताच समोरील बाजूला (कॅबिनखाली) चालक बबन ढगे हे दबले गेले. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच टँकरचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी स्थानिक कंत्राटदार राजेंद्र चंद्रकांत मेस्त्री (वय २९, रा. पिंपळी खुर्द, सुतारवाडी) यांनी पोलिसांत खबर दिली. स्वतःच्या मरणास आणि टँकरच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी मृत चालक बबन ढगे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७१/२०२५ अन्वये करण्यात आली असून, अरुंद पुलांवरून वाहने चालवताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.