गुहागर-विजापूर महामार्गावर टँकरला अपघात
अंगावर टँकर पडल्याने चालक जागीच ठार
चिपळूण: गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास वाशिष्ठी नदीवरील पुलाजवळ असलेल्या कॅनलजवळ टँकरचा अपघात होवून त्यात चालक जागीच ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा टँकर (एमएच- १६ एई ६१०० ) हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यावेळी चालकाने टँकरमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला असता टँकर जोरदार पलटी झाल्यामुळे चालक टँकर खाली दबला गेला. त्याचा त्यातच दुर्दैवी अंत झाला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका कारचा भीषण अपघात होवून ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा याच ठिकाणी हा अपघात झाल्याने मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या पुलाजवळ सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.