चिपळूण पालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादी स्वबळावर
चिपळूण: चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला महायुती (शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (ठाकरे सेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस) यांचे गणित जुळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये बिघाडी झाली असून, राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) हे तिन्ही पक्ष आग्रही होते. चर्चेत सुरुवातीपासून महायुतीसोबत राहण्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादीला (अजित पवार गट) बाजूला ठेवत, अखेरीस शिंदेसेना आणि भाजपने युती केली आहे. या युतीत भाजपने १२, तर शिंदेसेनेने १६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिंदेसेनेचे उमेश सकपाळ हे नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत.
महायुतीतून वगळल्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर मैदानात उतरला आहे. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून मिलिंद कापडी यांनी माघार घेतली असून, राष्ट्रवादीने नगरसेवकपदासाठी १५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाठिंब्यासाठी इच्छुकांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे गळ घालण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात जागावाटप निश्चित झाले आहे. आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार रमेश कदम यांच्यात दिलजमाई झाल्याने ठाकरे सेनेत दोन गट पडल्याची चर्चा आता थंडावली आहे. यात आमदार जाधव गटाला १२ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला १६ जागा सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदावरून बंडाळी झाली आहे. तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांना शह देत सुधीर शिंदे यांना बळ देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले शाह यांनी अखेर अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
निवडणुकीचे स्वरूप दिवसागणिक बदलत असून, पुढील १० दिवसांत उमेदवारांचे चारित्र्य, वाढलेले वय, जातीचे वलय, आणि पक्षाची निष्ठा यांसारखे मुद्दे निवडणुकीत गाजणार असल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी अनेक अपक्ष आणि प्रमुख उमेदवारांच्या पाठिंब्यावरच अंतिम विजय अवलंबून असेल.