राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकण नगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन; उमेदवारांना स्थानिकांचा प्रचंड प्रतिसाद
नौसीन काझी आणि सौ. मुनव्वर-सुलताना मुल्ला यांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ
रत्नागिरी : कोकण नगर (प्रभाग क्र. ४): आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण नगर, प्रभाग क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नौसीन काझी आणि सौ. मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला यांच्या प्रचारासाठी स्थानिकांनी मोठ्या उत्साहात गर्दी करत पाठिंबा दर्शविला.
स्थानिक आणि तरुणांचा उमेदवारांना पाठिंबा
प्रभाग क्रमांक चारमधील या दोन्ही उमेदवारांचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्थानिक असून तरुण आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयातून स्थानिकांच्या समस्या आणि अडीअडचणींची कामे सातत्याने सोडवली आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. कालच्या प्रचारामध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद हेच दर्शवून गेला. विशेषतः, प्रचार सभेला उपस्थित असलेल्या स्थानिकांची मोठ्या प्रमाणात असलेली गर्दी लक्षणीय होती.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनाही मोठा प्रतिसाद
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. वहिदा बशीर मुर्तुझा यांना संपूर्ण शहरातून जो भरघोस प्रतिसाद मिळत आहे, तोच उत्साह आणि पाठिंबा कोकण नगर प्रभाग क्रमांक चारमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून आला. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वहिदा मुर्तुझा यांच्या नेतृत्वाला समर्थन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नौसीन काझी आणि सौ. मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला हे दोन्ही उमेदवार अत्यंत कार्यक्षम असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे भाकीत त्यांनी केले. तसेच, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. वहिदा बशीर मूर्तुझा यांना मिळणारा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
या प्रचार शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात राष्ट्रवादीचे राजन सुर्वे, माजी युवक शहराध्यक्ष मुजफ्फर काजी, फरहान मुल्ला, तौसीफ डिंगणकर, दानिश पटेल, जावेद परदेसी, शमीम नाईक यांच्यासह बहुसंख्य स्थानिक आणि महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती.
कोकण नगरमधील या जोरदार शक्तिप्रदर्शनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीच्या तयारीची आपली दमदार सुरुवात केली आहे.