राजापुरात भाजपच्या अपक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल पटेल यांची माघार,
7 नगरसेवकांनी घेतले अर्ज मागे
जोती सुनील खटावकर, हुस्नबानू खलिफे, श्रुती ताम्हणकर यांच्यात नगराध्यक्षपदासाठी चुरस
राजापूर : राजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठी हालचाल पाहायला मिळाली. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या शीतल पटेल यांनी आपला अपक्ष अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीतील अनिश्चितता संपुष्टात आली.
दरम्यान 7 नगरसेवकांनी अर्ज माघारी घेतले. यामध्ये प्रभाग ‘ब’ मधून शैबाज खलिफे, प्रभाग 2 ‘ब’ मधून सोनल केळकर, प्रभाग 4 मधून भाजपाचे सुशांत पवार, शिवसेना (उबाठा) चे संजय पवार आणि अपक्ष आदित्य बाकळकर यांनीही माघार घेतली. काल प्रभाग 7 ‘ब’ मधून आदिल ठाकूर तर आज प्रभाग 10 ‘ब’ मधून कल्याणी रहाटे यांनी अर्ज मागे घेतले. असे एकूण नगराध्यक्ष पदासह 8 अर्ज माघारी घेण्यात आले.
या माघारीच्या मालिकेमुळे आता युती आणि आघाडी दोन्हीकडे प्रभागनिहाय समीकरणं नव्याने बसवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
प्रभाग 4 ‘ब’ मध्ये मनसे पुरस्कृत डॉ. राकेश खटावकर हे एकमेव उमेदवार असल्याने या प्रभागाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. हिंदू महासभेच्या जोती सुनील खटावकर, काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे आणि शिवसेना शिंदे गटाच्या श्रुती ताम्हणकर या तिघींमध्ये सरळ सामना होणार असून निवडणुकीची रणधुमाळी अधिक चुरशीची होणार आहे.