‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचा’राष्ट्रीय स्तरावर झेंडा!
राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत दैदीप्यमान यश
रत्नागिरी : मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचालित ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल’ सैतवडेच्या तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच त्यांच्या यशासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या क्रीडा शिक्षिका सौ. जाधव मॅडम आणि शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. कोळेकर सर यांचा मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. अब्दुल रहीम हसन माद्रे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांच्या या गौरवशाली कामगिरीबद्दल त्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे कौतुक करण्यात आले. संस्थेने या यशस्वी विद्यार्थ्यांचा लवकरच एका भव्य सत्कार समारंभात गौरव करण्याचे जाहीर केले आहे.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गनी खतीब यांच्यासह संस्थेचे सदस्य सर्वश्री. अजीज माद्रे, शफी चिकटे, अक्रम कापडे, इलियास माद्रे, रज्जाक फकीर, निसार खतीब, हशमत निवेकर आणि रुमान पारेख यांची उपस्थिती होती.
या सत्कार सोहळ्यादरम्यान संस्थेच्या इतर दोन सदस्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेचे सदस्य श्री. निसार खतीब हे नुकतेच उमराह करून परतले असल्याने संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच, संस्थेचे सदस्य श्री. अकरम कापडे हे नुकत्याच झालेल्या एका मोठ्या अपघातातून सुखरूप बचावले आणि पूर्णपणे बरे होऊन संस्थेच्या सेवेसाठी आजच्या बैठकीस उपस्थित राहिले. त्यांच्या या धैर्याबद्दल आणि संस्थेवरील निष्ठेबद्दल त्यांचाही यावेळी खास सत्कार करण्यात आला.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील यशाबरोबरच आपल्या सदस्यांच्या कार्याचा आणि कल्याणाचाही आदर राखत त्यांच्या सन्मानाची परंपरा कायम ठेवली आहे.


