रत्नागिरी न. प. शाळेत पंखा कोसळून शिक्षिका जखमी
रत्नागिरी
कोकणनगर येथील नगरपरिषद शाळा क्र. १९ (उर्दू) येथे मंगळवारी सकाळी शिकवणी दरम्यान नव्याने बसविण्यात आलेला पंखा अचानक कोसळून शिक्षिका शहनाज इमदाद मुल्ला जखमी झाल्या. यावेळी शाळेत काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
घटनेची वेळी शिक्षिका शहनाज मुल्ला वर्गात शिकवत असताना पंखा सरळ त्यांच्या डोक्यावर कोसळला. पंख्याचे काम नव्याने केले असल्याने त्याची गुणवत्ता, तांत्रिक पाहणी आणि बसविण्याच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमी शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पालक मोठ्या संख्येने शाळेत धावून आले. मात्र विद्यार्थ्यांना इजा झाली नसल्याचे कळताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला; मात्र नव्या कामातील निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाने तात्काळ चौकशी करून जबाबदार कंत्राटदार व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून जोरदारपणे करण्यात येत आहे.