मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील दागिने चोरीचा उलगडा
आरपीएफची शिताफीची कारवाई, ५० लाखांचे दागिने जप्त
खेड:
कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांमध्ये होत असलेल्या दागिने चोरीच्या घटनांचा मोठा उलगडा करत रेल्वे संरक्षण दलाने मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या चार संशयितांना मडगाव येथे शिताफीने जेरबंद केले आहे. अटकेतील चौघांकडून तब्बल ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ३४,५०० रुपयांची रोकड आणि चार मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अनेक चोरीप्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता असून, आरपीएफच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दक्षिण रेल्वेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हे संशयित मत्स्यगंधा एक्स्प्रेसने सुरतहून मडगावकडे प्रवास करत असल्याचे समजताच दक्षिण रेल्वेचे आयजी-कम-पीसीएससी अरुल ज्योती यांनी कोकण रेल्वेचे आयजी-कम-पीसीएससी अभिषेक कुमार आणि मुख्यालयातील एएससी/सी अँड आय जुबैर खान पठाण यांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले.
यानंतर संशयितांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकातील काही सदस्यांनी टीटीईचा गणवेश परिधान केला होता, तर काहींनी फेरीवाला आणि सामान्य प्रवासी म्हणून रूप धारण केले. पथकाने मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील जनरल डब्यांमध्ये सापळा रचला होता.
गाडी मडगाव स्थानकात पोहोचताच पथकाने कोणत्याही धावपळीशिवाय चारही संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात चोरीतील दागिने, रोकड आणि मोबाईल आढळून आले. चौघांना पुढील चौकशीसाठी दक्षिण रेल्वेच्या आरपीएफ एमएक्यूकडे सोपवण्यात आले आहे.
या अटकेमुळे कोकण रेल्वेवरील दागिने चोरीच्या अनेक प्रकरणांचा उलगडा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.