महायुतीची बोट ओव्हरलोड झालीय, कोणत्याही क्षणी बुडणार
बाळ माने यांचा घणाघात, महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा,
रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या महायुतीवर धारदार टीकास्त्र सोडले आहे. मित्रपक्षांना तिकीट वाटताना शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची दमछाक झाली असून, ‘महायुतीचे बोट आता ओव्हरलोड झाले आहे’ असा टोला माने यांनी लगावला.
माने यांनी दावा केला की, ओव्हरलोड झाल्याने आता महायुतीतून ‘आउटगोईंग’ (निर्गमन) सुरू झाले आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या पक्षाकडे येत आहेत. “या निवडणुकीत ‘बाप कोण आणि कोण स्ट्राँग’ हे जनतेने ठरवले आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बाळ माने यांनी महाविकास आघाडीच्या (MVA) वाढत्या ताकदीचे प्रदर्शन केले. महाविकास आघाडीला आता रत्नागिरीत केवळ काँग्रेस-राष्ट्रवादी (पवार गट) नव्हे, तर रिपब्लिकन पार्टी, वंचित आघाडी, बहुजन समाज पार्टी (बसपा) आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) देखील जाहीर पाठिंबा दिला आहे.
पत्रकार परिषदेवेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश कीर, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, ज्येष्ठ नेते प्रमोद शेरे, , राष्ट्रवादीचे (पवार गट) नेते मिलींद कीर आणि मनसेचे अविनाश सौंदाळकर यांच्यासह सर्व समर्थक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीने उमेदवार जाहीर करण्यास केलेला विलंब हा महाविकास आघाडीच्या वाढत्या रूपाचे लक्षण असल्याचे माने यांनी सांगितले. मात्र, महायुतीच्या उमेदवारांमुळे आम्हाला कोणताही प्रश्न येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना थेट आव्हान देत निवडणुकीत ज्वलंत मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मागणी केली की, डांबर घोटाळ्याशी संबंधित ४४ कोटी रुपयांचे व्हाऊचर निवडणुकीपूर्वी जनतेसमोर जाहीर करावे.
शहरात सध्या जी डांबरीकरणाची कामे सुरू आहेत, ती केवळ निवडणूक आली म्हणून जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे, अशी टीका माने यांनी केली.
बाळ माने यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांच्या जागाही महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल.