कोत्रेवाडी ग्रामस्थांचे उपोषण तात्पुरते स्थगीत
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निर्णय
लांजा – कोत्रेवाडी डम्पिंग ग्राऊंड विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता विराम देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला बाधा येऊ नये तसेच आचारसंहितेचा भंग होऊ नये, याकरिता ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. १४ ऑगस्टपासून सलग सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाने १३ नोव्हेंबर रोजी तब्बल ९३ दिवसांचा टप्पा गाठला. या काळात ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत प्रशासनाकडून डम्पिंग ग्राऊंडविरोधातील आक्रोश सातत्याने नोंदवला होता. आचारसंहिता लागू होताच लांजा पोलीस ठाण्याकडून उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले.
त्यानुसार ग्रामस्थांनी १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता उपोषण स्थगित केले. यावेळी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार उपस्थित होते. उपोषण मागे घेतना ग्रामस्थांनी लेखी पत्र सादर केले आहे. तसेच ग्रामस्थांचा लढा अद्याप संपलेला नाही. निवडणुकीची आचारसंहिता संपताच उपोषण पुन्हा सुरू करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोत्रेवाडी डम्पिंग ग्राऊंड प्रकरणावर निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.