खेडजवळ भरधाव दुचाकीची धडक; रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिला गंभीर जखमी
खेड/रत्नागिरी: तालुक्यातील भरणे येथे मुरली मनोहर पतसंस्थेसमोर गोवा-मुंबई लेनवर रस्ता ओलांडत असलेल्या दोन महिलांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून, धडक देणारा अज्ञात दुचाकीस्वार अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला आहे. ही घटना १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात वैशाली तुषार राऊत (वय २४, रा. भरणे, ता. खेड) आणि प्रतिक्षा प्रल्हाद खडके या दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमी वैशाली राऊत यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी वैशाली राऊत आणि त्यांच्यासोबत असलेली एक महिला, अशा दोघी जणी मावशीच्या मुलांना क्लासमधून आणण्यासाठी गेल्या होत्या.
ते परत येत असताना मुरली मनोहर पतसंस्थेच्या समोरून गोवा-मुंबई लेनवर रस्ता ओलांडत असताना, एम.एच.०८ बी.एफ.०५८७ या क्रमांकाच्या दुचाकीवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल अत्यंत अविचाराने, हयगयीने आणि निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवत या दोघींना जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे वैशाली राऊत आणि प्रतिक्षा खडके या दोघीही रस्त्यावर कोसळून जखमी झाल्या. मात्र, अपघात घडवून आणलेला अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता थेट पळून गेला.
या घटनेची नोंद १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ००:२५ वाजता खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गु.आर.नं. ३४७/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (व) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४, १३४ (अ), (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.