गुहागरमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
राहत्या घरी गळफास घेतल्याने खळबळ
गुहागर: गुहागर तालुक्यातील वरचापाट मोहल्ला येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा ते १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चाँदमियाँ शरफुद्दिन भाटकर (वय ५५, रा. वरचापाट मोहल्ला, गुहागर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भाटकर यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजल्यानंतर आणि १४ नोव्हेंबर च्या सकाळी ८ वाजेच्या आत भाटकर यांनी गुहागर, वरचापाट मोहल्ला येथील त्यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये आत्महत्या केली. त्यांनी लोखंडी बीमला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीवन संपवले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर भाटकर यांचे मावस भाऊ बशिर अहमद शेखहसन बालाभाई यांनी तातडीने पोलिसांना खबर दिली. त्यानंतर, १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११:२६ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यू क्रमांक (आमृ. क्र.) ३८/२०२५ अन्वये भारतीय न्याय सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस भाटकर यांच्या कुटुंबियांची आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत.