रत्नागिरी शहर पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई!
३०० ग्रॅम गांजा जप्त; नेपाळमधील आरोपीला अटक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी दिलेल्या कठोर सूचनांनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवायात मोठे यश मिळवले आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई
दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे मांडवी, पेठकिल्ला परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मिरकरवाडा येथील जेटीच्या बाजूला असलेल्या एका पडीक बोटीच्या कॅबिनजवळ एक इसम आपल्या पाठीमागे हिरव्या रंगाची सॅक लावून संशयास्पद हालचाली करताना दिसून आला.
पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्या सॅकबद्दल चौकशी केली असता, तो उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे देऊ लागला. यामुळे संशय बळावल्याने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे यांनी स्वतः दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली.
आरोपीची ओळख व मुद्देमाल जप्त
झडतीदरम्यान, या इसमाने त्याचे नाव मोहनसिंग रामचंद्र भाट (वय २६), मूळ रा. गाव भाटेश्वर, जिल्हा डडेल्धुर, राज्य-नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, ता. जि. रत्नागिरी असे सांगितले. मोहनसिंग भाट याच्या ताब्यातील हिरव्या रंगाच्या सॅकची तपासणी केली असता, त्यातील मधल्या कप्प्यामध्ये काळपट हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बिया असलेले ३०० ग्रॅम वजनाचे ‘गांजा’ हा अमली पदार्थ काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत आढळून आला.
पोलिसांनी गांजा आणि इतर मुद्देमाल मिळून एकूण १४,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हा दाखल आणि पोलीस कोठडी
आरोपी मोहनसिंग रामचंद्र भाट यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३४/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८(क), २०(ब) ii (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आरोपी मोहनसिंग भाट याच्यावर यापूर्वी देखील रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४१९/२०२४ अन्वये अमली पदार्थांसंबंधी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यशस्वी कामगिरी करणारे पथक
ही प्रभावी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील आणि त्यांच्या पथकातील खालील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली:
१) पो.उपनिरीक्षक श्री. सागर शिंदे
२) पो.हवा/१३९९ अमोल भोसले
३) पो.हवा/१११२ आशिष भालेकर
४) पो.हवा/३०८ कुशल हातीसकर
५) पो.हवा/१२२० रणजित जाधव