विमा उतरवण्यासाठी १० टक्केच बागायतदारांचा प्रतिसाद
फळपिक योजनेला अल्प प्रतिसाद ; ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत
रत्नागिरी
आंबिया बहरातील आंबा, काजू फळपिक विमा योजनेला कमी प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ७९८ शेतकऱ्यांनी १ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्केही बागायतदारांनी विमा उतरवलेला नाही.
बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबवण्यात येते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळातील आंबा व काजूपिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जाते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. खातेदार शेतकरीव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही यांना योजना लागू आहे; मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिकविमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास त्याबाबतचे घोषणापत्र सहभाग नोंदवण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधित बँकेत देणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याला अधिसूचित फळपिकांसाठी ०.१० हेक्टर ते जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल. ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरवता येणार आहे. मागील हंगामात आंबा व काजू बागायतदारांना विमा लाभांश मिळताना विलंब झाला तसेच काही गावात वातावरण बदलाचा परिणाम होऊनही विमा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे यंदा पहिल्या टप्प्यात विमा उतरवणाऱ्यांचा टक्का कमी झाला आहे.