खेड नगराध्यक्षपदावर वैभव खेडेकरांचा दावा
पत्नी वैभवी खेडेकरांच्या उमेदवारीसाठी हालचाली
खेड: आजपासून प्रत्यक्ष नामांकन भरता येणार असून 17 तारखेपर्यंत याची मुदत असेल.याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असतानाच मात्र महायुतीच्या गोटात मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह कदम पितापुत्रांना होम पिच असलेल्या मतदारसंघात भाजपने कडवे आव्हान निर्माण करण्यात सुरूवात केली आहे. येथे नुकताच भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांनी बायकोच्या नगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू करत थेट दावाच केला आहे. यामुळे आता महायुतीतील कोकणातून बेबनाव समोर आल्याची चर्चा येथे रंगली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महायुती, महाविकास आघाडीत लढत होण्याची शक्यता असतानाच स्थानिक आघाड्याही नशीब आजमवणार आहेत. अशातच येथे महायुतीतील बेबनाव समोर आला असून भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असाच अनेक ठिकाणी सामना होण्याची आता शक्यता आहे.
आता या वादात खेड नगरपरिषदेची देखील भर पडली असून येथे नुकताच भाजपवासी झालेले वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. त्यांनी आपल्या पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
खेड नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून रामदास कदम आणि योगेश कदम यांचे वर्चस्व राहिले असून येथे भगवा फडकावण्यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील लक्ष घातले आहे. पण आता खेडेकर यांच्याकडून कदम पितापुत्रासह थेट शिवसेनेच्या र्चस्वालाच आव्हान देण्यात आल्याने युतीच्या घोषणेआधीच येथे मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.
मनसेतून हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश चांगलाच चर्चेत आला होता. सलग तीन वेळा त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. यानंरत त्यांचा प्रवेश नुकताच झाला होता. यादरम्यान त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह खुद्द उदय सामंत यांनी देखील अप्रत्यक्ष शिवसेनेची ऑफर दिली होती.
तसेच खेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी देखील जाहीरपणे खेडेकर यांना जुने वाद विसरुन महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती.पण ते भाजपमध्ये प्रवेश करण्यावर ठाम राहिले. आणि आता भाजपवासी होताच त्यांनी कदम पितापुत्राच्या वर्चस्वाला आव्हान देत थेट पत्नी वैभवी खेडेकर यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरवले आहे.
दरम्यान शिंदेच्या शिवसेनेकडून देखील उमेदवार जाहीर करण्यात आला असून माधवी बुटाला यांचे नाव खेडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आघाडीवर आहे. पण खेडेकर यांनी आपल्या पत्नीचे नाव जाहीर केल्याने महायुतीमध्ये संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे आता हा वाद महायुतीतील नेते कसा थांबवतात? शिंदेंची शिवसेना काय पाऊल उचलणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.