राजापूर न. प. साठी एकही अर्ज दाखल नाही
राजापूर: राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र पहिल्या दिवशी सोमवारी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
मात्र सोमवारी थकित मालमत्ता कर भरणे व माहिती घेणेसाठी अनेकांनी नगर परिषद कार्यालयात गर्दी केली होती.
राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सोमवारी 10 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. असून अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर पर्यंत असून, निवडणूक चिन्हांचे वाटप 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
राजापूर तहसीलदाल तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास गंबरे यांच्या अधिपत्त्याखाली ही निवडणूक प्रक्रिया होत आहे. ऑनलाईन पध्दतीने हे उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत.
सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी राजापुरात एकही अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी केली असून पाच टेबल हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणेकामी तर एक टेबल हे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. तर याबाबत माहिती देण्यासाठीही टेबल ठेवण्यात आले आहे.
मात्र सोमवारी अनेक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी माहिती घेण्यासाठी तसेच अनेकांनी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी भरण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गर्दी केली होती.