दापोली-खेड महामार्गावर कारची रिक्षाला धडककारचालक फरार
दापोली (प्रतिनिधी): दापोली-खेड महामार्गावरील टाळ-सुरे शेलारवाडी परिसरात झालेल्या अपघातात एका बीएमडब्लू कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा रस्त्याच्या कडेला कलंडली असून, सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवार, ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३:३० वाजता घडली.
या संदर्भात रिक्षाचालक सुचित भाटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दापोलीहून खेडच्या दिशेने रिक्षा घेऊन जात असताना मागून आलेल्या बीएमडब्लू कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. धडकेचा जोर एवढा होता की भाटकर गाडीतून बाहेर फेकले गेले, मात्र गंभीर दुखापत होण्यापासून ते थोडक्यात बचावले.
धडक झाल्यानंतर संबंधित कारचालकाने थांबून पाहिल्याशिवाय घटनास्थळावरून पलायन केल्याचे समजते. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ रिक्षा बाजूला केली असून, पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.