उमेद’च्या सहकार्याने ग्रामविकासाचा नवा अध्याय! कोतवडे प्रभागात PRI-CBO Convergence प्रोजेक्टची यशस्वी कार्यशाळा
रत्नागिरी : महिला सक्षमीकरणातून स्थानिक स्वराज्य संस्थेत सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर
कोतवडे, (दिनांक ५ नोव्हेंबर २०२५): उमेद अभियानांतर्गत सुरू असलेल्या PRI-CBO Convergence प्रकल्पाने कोतवडे प्रभागात ग्रामविकासाच्या प्रक्रियेला एक नवी दिशा दिली आहे. दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कोतवडे प्रभागात आयोजित करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या समुदाय-स्तरीय मूल्यमापन कार्यशाळेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ती यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेमुळे महिला सक्षमीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सक्रीय सहभाग वाढण्यास मदत मिळणार आहे.
प्रार्थना, दीपप्रज्वलन आणि मान्यवरांचे मनोगत
कार्यशाळेची सुरुवात प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, प्रकल्प अंतर्गत विभागात झालेल्या विकास कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात तालुका व्यवस्थापक मॅडम यांनी प्रकल्पाविषयी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासोबतच वरी गावचे सरपंच, कोतवडे व नेवरे गाव ग्रामपंचायत अधिकारी, तालुका व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती नाकाडे, तालुका संसाधन व्यक्ती तोडणकर, प्रभाग व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, स्थानिक संसाधन व्यक्ती, गाव पातळीवरील संस्था, अक्षरज्योती प्रतिनिधी (महिला), बालसभेतील प्रतिनिधी अध्यक्ष, प्रभागाच्या अध्यक्ष मॅडम यांसारख्या विविध स्तरावरील प्रतिनिधींनी गावाच्या विकासातील या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट केले.
गॅलरी वॉकद्वारे कामांचे मूल्यांकन
कार्यशाळेचा मुख्य भाग म्हणून ‘गॅलरी वॉक’ आयोजित करण्यात आला होता. या गॅलरी वॉकमध्ये ग्रामसंघनिहाय झालेल्या कामांचे चार्टद्वारे केलेले प्रेझेंटेशन पाहून त्याचे मूल्यमापन करण्यात आले. तालुका व्यवस्थापक साक्षी वायंगणकर मॅडम आणि जिल्हा संसाधन व्यक्ती नुजहत नाकाडे मॅडम यांनी ग्रामसंघ आणि गाव पातळीवरील संस्थेच्या सदस्य, तसेच PRI चे सरपंच व सदस्य या मान्यवरांना या कामांची योग्य माहिती दिली. तसेच तालुका संसाधन व्यक्ती तोडणकर मॅडम , जेजुरकर सर , प्रणव सर , अमेय सर , मोरे सर , प्रभाग व्यवस्थापक आरती मॅडम व इतर मान्वयवर उपस्थित राहुन आपले मनोगत व्यक्त केले तालुका व्यवस्थापक मा. साक्षी वायंगणकर मॅडम यांनी प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या सर्व ऍक्टिव्हिटीजची सविस्तर माहिती देऊन महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली.
पंचायत राज संस्थेच्या सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
यावेळी PRI (पंचायत राज संस्था) सदस्यांनी प्रकल्पांतर्गत आपले मनोगत व्यक्त केले आणि या उपक्रमांचे गावाच्या विकासात मोठे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला. उमेद अभियानामुळे झालेले महिला सक्षमीकरण आणि या प्रोजेक्ट अंतर्गत बदललेली विचारसरणी याचे स्वागत उपस्थित सरपंच आणि वॉर्ड मेंबर्सनी केले. गॅलरी वॉक दरम्यान पंचायत राज संस्थेच्या सदस्यांनी सर्व ऍक्टिव्हिटीज समजून घेतल्या आणि त्यांची नियमितता महत्त्वाची असल्याचे नमूद केले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्काची माहिती देऊन, स्थानिक शासन प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया उभा करता येतो हे सिद्ध झाले. तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या मार्गदर्शनानुसार ही समुदाय-स्तरीय मूल्यमापन कार्यशाळा प्रभाग स्तरावर यशस्वीरित्या पार पाडण्यात यश मिळाले आहे.
