खेडशी देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला अटकपूर्व जामीन
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर चालणाऱ्या देहव्यापार प्रकणातील मुख्य संशयिताला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. सलमान नजमुद्दीन मुकादम (30, रा. मिरकरवाडा रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या भितीने सलमान हा मागील 6 महिन्यांपासून फरार होता. या प्रकरणातील सहआरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळताच सलमान याने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार शहरानजीकच्या खेडशी येथील गौरव ब्रेड ॲण्ड ब्रेकफास्ट या लॉजवर चालणाऱ्या देहव्यापाराचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व रत्नागिरी ग्रामीण पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला होता. 13 मे 2025 रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या 4 महिलांना ताब्यात घेतले होते. तसेच या अनैतिक व्यापार प्रकरणी अरमान खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर सलमान नजमुद्दीन मुकादम व अन्य एक संशयित असे तिघांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.