दापोलीतील मुरूडच्या समुद्रकिनारी हुल्लडबाजी
व्हिडिओ काढून स्टंटबाजी
दापोली: दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी पुन्हा एकदा पर्यटकांकडून बेफिकीर हुल्लडबाजीचा प्रकार घडला आहे. रविवारी (ता. २) दुपारी काही पर्यटकांनी समुद्राच्या उथळ पाण्यात भरधाव मोटार चालवली.ही गाडी नाशिक येथील असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पर्यटकांनी पाण्यातून मोटार चालवत फोटो व व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी काही स्थानिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना थांबवले आणि समजूत काढली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी या वाहन व पर्यटकांविषयी तपास सुरू केला असून, स्थानिक प्रशासनालाही या घटनेबाबत कळवण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे; मात्र किनाऱ्यांवर सुरक्षेचा अभाव दिसून येत असून, गस्तदेखील कमी असल्याची चर्चा सुरू आहे. स्थानिक व मत्स्य व्यावसायिकांनी प्रशासनाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.