मंडणगडात प्रतिबंधित तंबाखू, पान मसाल्याचा साठा जप्त
दुकानदारावर गुन्हा दाखल
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाने जनहित आणि जनआरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थ मंडणगड बाजारपेठेतील एका दुकानात विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे ३,५२० रुपये किंमतीचा विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे.
ही घटना दि. ०४/११/२०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मंडणगड बाजारपेठेतील ‘माहालक्ष्मी ट्रेडर्स’ या दुकानात घडली. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अमित बाळासो भोसले (वय ३२, पोकॉ/४२४) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात राज्याच्या अधिसूचनेद्वारे प्रतिबंधित करण्यात आलेला ‘केसरयुक्त विमल पान मसाला’ आणि ‘वि-१ तंबाखू’चा साठा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला आढळला.
जप्त केलेल्या मालामध्ये ३,१६८ रुपये किमतीची केसरयुक्त विमल पान मसाला चॉकलेटी रंगाच्या पाकिटांची १५ पाकिटे आणि ३५२ रुपये किमतीचे चॉकलेटी रंगाचे वि-१ तंबाखू असलेले १६ पाकिटे असा एकूण ३,५२० रुपये किमतीचा साठा आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शशिकांत नामदेव कपडेकर (वय ५६, रा. भिंगळोली, दापोली फाटा हॉटेल मंडणगड ढाबे समोर, ता. मंडणगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गु.र.क्र. ५६/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२) (i), २६(२) (iv), २७ (३) (d), ३०(२) (a), ३(१) (zz) (iv) या कायद्यांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरवलेल्या या पदार्थांच्या अवैध विक्री आणि साठ्याविरोधात पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.