मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांना रोटरी क्लब रत्नागिरीचा ‘टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान
रत्नागिरी: रोटरी क्लब रत्नागिरीच्या वतीने मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणामध्ये त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लब रत्नागिरी गेल्या ६८ वर्षांपासून रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. क्लबकडून दरवर्षी ‘टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड’ किंवा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना गौरवले जाते. यंदाचा हा सोहळा हॉटेल विवेक येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते गौरव
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल डॉ. लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते डॉ. केतन चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. डिकोस्टा यांनी शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक देऊन डॉ. चौधरी यांचा यथोचित सन्मान केला. डॉ. केतन चौधरी हे गेल्या ३० वर्षांपासून मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे कार्यरत असून त्यांनी मत्स्य अभियांत्रिकी क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
यावेळी रत्नागिरीतील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्यासाठी व्यासपीठावर रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. प्रमोद कुलकर्णी, सचिव श्री. विरकर, तसेच वरिष्ठ रोटेरियन श्री. दिलीप भाटकर आणि श्री. धरमसी चौहान उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माधुरी कळंबटे आणि वेदा मुकादम यांनी केले.