पोलीस मुख्यालय व पोलीस रहिवासी इमारतीचे काम करताना महापुरुष मंदिराचे नुकसान
रत्नागिरी :
जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात सध्या पोलीस मुख्यालय व पोलीस रहिवासी इमारतीचे काम सुरु असून, हे काम करताना ठेकेदाराने पुरातन भव्य अशा महापुरुष मंदिराचा काही भाग पाडून नुकसान केले. यामुळे पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत निवृत्ती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी ना. सामंत यांनी महापुरुष मंदिर उभारणीसाठी निधी देण्याचे मान्य केले.
पोलीस मुख्यालयातील बांधकाम वेगाने सुरु असून, हे काम करताना स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भावनांचा अनादर करीत ठेकेदाराने महापुरुष मंदिराचे नुकसान केले. ही बाब निवृत्त कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनीही आक्रमक होत मुळ मंदिर पाडण्यात येऊ नये अशी भूमिका घेतली. नव्याने वसाहत उभारताना या मंदिराचेही नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी पोलीस कर्मचारी व निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसह आ. किरण सामंत, पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.
या मंदिरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. विविध कोर्सेसच्या वेळेला. किंवा बाहेरुन पोलीस बंदोबस्त आलेला असताना याच ठिकाणी अनेकांची राहण्याचीही व्यवस्था होत असते. हे पुरातन मंदिर असून याचे नुतनीकरण करावे अशी मागणी केली. याबाबत रत्नागिरी जिल्हा सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष निवृत्त डीवायएसपी विलास भोसले व कार्याध्यक्ष ओंकार चाळके यांच्यासह मोठ्या संख्येने निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्र येत पालकमंत्री सामंत यांची भेट घेतली. यावेळी ना. सामंत यांनी ठेकेदाराला बोलावून घेत, मंदिराचे नुतनीकरण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसह जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.