गणपतीपुळे समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
चिमुकला वाचला, पण वडील बेपत्ता
गणपतीपुळे: निसर्गरम्य गणपतीपुळे समुद्राचा मोह दिवाळी पर्यटन हंगामात दोन कुटुंबासाठी जीवघेणा ठरला आहे. मोठ्या उत्साहाने देवदर्शनासाठी आलेल्या पुणे आणि रायगड येथील दोन वेगवेगळ्या कुटुंबांवर अवघ्या २४ तासांत दुःखाचा डोंगर कोसळला. यात पुण्यातील एका १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर रायगड येथील एका चिमुकल्याला वाचवण्यात यश आले असले तरी, त्याचे वडील मात्र अद्याप बेपत्ता आहेत.
शुक्रवारच्या घटनेत केशवनगर (पुणे) येथील निखिल शिवाजी वाघमारे (वय १८) हा शुक्रवारी सायंकाळी समुद्रात बेपत्ता झाला होता. पोलीस आणि जीवरक्षकांनी रात्रभर शोध घेतला, पण अखेर शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी त्याचा मृतदेह मालगुंड गायवाडी समुद्रकिनाऱ्यावर आढळला. उत्साही निखिलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दुसरी घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजता घडली. पेण, रायगड येथील नितीन शंकर पवार (वय ३५) हे त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा आयांश याला घेऊन समुद्रात उतरले असता लाटांमध्ये अडकले. देवदूतासारखा धावून आलेल्या स्थानिक फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवत आयांशला तातडीने बाहेर काढले. आयांशला वाचवण्यात यश आले असले तरी, वडील नितीन पवार मात्र समुद्रात बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पर्यटन हंगामात या दोन लागोपाठच्या घटनांमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समुद्राचा वेध घेताना पर्यटकांनी जीवरक्षकांच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन्ही घटनांचा तपास जयगड पोलीस करत आहेत.