बुद्धविहार होणारच! विरोधकांना भीम युवा पँथरचे आव्हान
रत्नागिरी: तालुक्यातील थिबाराजाकालीन बुद्धविहाराच्या विकासकामासंदर्भात निर्माण झालेल्या वादावर ‘भिम युवा पँथर’ या संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. संघटनेचे अध्यक्ष प्रीतम आयरे यांनी यावेळी बोलताना बुद्धविहाराच्या कामात अडथळे आणणाऱ्या काही व्यक्ती स्वतः च्या स्वार्थासाठी विरोध करत आहेत. ते कितीही विरोध करू देत आम्ही बुद्धविहार करणारच , केवळ समाजामध्ये पसरलेला संभ्रम दूर करण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्यास प्रीतम आयरे यांनी सांगितले.
‘भिम युवा पँथर’ची स्थापना २०१८ मध्ये रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाजात होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि समाजाला संघटित करण्यासाठी करण्यात आली होती. भीमा कोरेगाव येथील अन्यायाच्या निषेधार्थ रत्नागिरीतील युवकांना एकत्र आणून न्याय देण्याचे काम संघटनेने केले आहे. सुरुवातीला तालुक्यातील धार्मिक संघटनांना एकत्र आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘एक तालुका एक जयंती’ साजरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या थिबाराजाकालीन बुद्धविहार स्थळाच्या विकासासाठी विविध संघटनांनी प्रयत्न केले होते, परंतु एकमत नसल्याने प्रश्न प्रलंबित राहिला. ‘भिम युवा पँथर’ने पुढाकार घेत १७ऑगस्ट २०२३ रोजी स्थानिक वृत्तपत्रात जाहीर आवाहन करून धार्मिक संघटनांची बैठक घेतली. या बैठकीत एकमत झाल्यावर ‘थिबाराज कालीन बुध्दविहार स्थळ विकास चॅरिटीटेबल ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली.
या ट्रस्टच्या प्रयत्नांमुळे आणि तत्कालीन पालकमंत्री ना. श्री. उदयजी सामंत यांच्या मध्यस्थीमुळे दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत १७.५० गुंठा जागा जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडे हस्तांतरित करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार २४ जुलै २०२४ रोजी गृहविभागातील पत्राने जागा जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित झाली.
जमीन हस्तांतरणानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी दीक्षाभूमी नागपूरच्या धर्तीवर शासनाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे बुद्धविहार बांधण्याची चर्चा झाली. ना. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनच्या निधीमधून ‘कम्युनिटी सेंटर’ या शीर्षकाखाली खर्च करण्याचे सुचवले, याला सर्वांनी सहमती दर्शवली. त्यानुसार २३ ऑक्टोबर २०२४ रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिवत भूमीपूजन करण्यात आले.
काही व्यक्ती ट्रस्टमध्ये स्थान न मिळाल्याने किंवा राजकीय स्वार्थापोटी हेतुपुरस्सर बदनामी व संभ्रम निर्माण करत आहेत. बुद्धविहाराच्या कामाला विरोध म्हणून आयु. रत्नदिप कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु ती कोर्टाने रद्द केली. विशेष म्हणजे, याच कांबळे यांनी २०१४ मध्ये शासकीय निधीतून विकासाची मागणी केली होती. तसेच अनंत सावंत हे स्थानिक कोर्टात शासकीय निधी खर्चास विरोध करत आहेत आणि समाजात हे बुद्धविहार नसून कम्युनिटी सेंटर होत असल्याचा संभ्रम पसरवत आहेत.
प्रीतम आयरे यांनी रत्नागिरीतील सर्व बौद्ध जनतेला आवाहन केले की, राजकीय पक्ष वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता, ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य माहिती घ्यावी आणि आपला संभ्रम दूर करावा. या पत्रकार परिषदेवेळी कार्याध्यक्ष उमेश कदम, उपाध्यक्ष तुषार पवार, प्रमोद पवार, सुजित चवेकर, मंगेश जाधव, सचिव शशिकांत कांबळे, सहसचिव नरेश कांबळे, सुनील पवार आदी उपस्थित होते.