शहर भाजपकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान
रत्नागिरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर भारत” आणि “स्वदेशी वापरा” या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत, रत्नागिरी शहर भाजपने नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाचे तोंड गोड करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना स्वदेशी बनवलेल्या बॅगमध्ये दिवाळी फराळ व आवश्यक दिवाळी साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे १५५ कर्मचारी उपस्थित होते. फराळ मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकला. अनेक कर्मचाऱ्यांनी “आमच्या कामाचे कौतुक झाल्यामुळे खूप बरे वाटले,” अशा भावना व्यक्त केल्या. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आशीर्वादातून त्यांच्या समाधानाची झलक स्पष्टपणे जाणवली.
यावेळी सत्यवती बोरकर, नितीन गांगण, प्रसाद बाष्ट्ये, केतन कडू, सिद्धेश कडू, विजय माळवदे, कामना बेग, मनोर दळी तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातून “स्वदेशीचा संदेश” आणि “आत्मनिर्भर भारत” घडविण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.